|

बेळगांव आणि गोव्याला जोडणारा रस्ता म्हणजेच आंबोलीचा घाट.पर्यटकांना सतत आव्हान देणारे असे हे आंबोली सुंदर स्थळांपैकी एक आहे.आंबोली घाटातुन प्रवास करताना निसर्ग पर्यटनाचा आस्वाद पर्यटक मनमुरादपणे घेत असतात.आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या टेकडया,बारमाही हिरव्यागार असणाऱ्या दऱ्या..पावसाळा कालावधीत तर या दऱ्या अधिकच हिरव्यागार दिसतात.
आंबोलीपासुन जवळच असलेल्या निसर्गरम्य चौकुळ जंगलात गवे,हरिण,भेकरे,बिबटया, ससे,रानमांजरे व वन्य प्राणी वास्तव्य करुन आहेत.शिवाय असंख्य वनौषधी सापडतात.गर्द वनराईने नटलेले हे चौकुळ गांव असुन जैविक विविधता या ठिकाणी आढळुन येते.आंबोली येथील महादेव गड,कावळे साद,शिरगांवकर,नट,सावित्री,पुर्वीचा वस असे असंख्य पॉईंट पाहण्यासारखे आहेत. हिरण्यकेशी नदीचा उगम येथुनच होतो.आंबोली ठिकाण सर्वच ऋतुत आल्हाददायक आणि हवे हवेसे वाटणारे आहे.पावसाळया शुभ्र फेसाळणाऱ्या स्नानाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडालेली असते.
इतिहास :
आंबोलीमध्ये अजुनही आपणांस संस्थानकालीन भव्य इमारती पहावयास मिळतात.महात्मा गांधी काही काळ या ठिकाणी वास्तव्य करुन शिरोडा येथील मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी याच आंबोली घाटातुन मार्गस्थ झाले होते.आंबोली पायथ्याशी असलेल्या दाणोली येथे शिर्डी साईबाबांचे समकालिन असलेल्या साटम महाराजांची समाधी आहे.भक्कम बुरुज असलेल्या ऐतिहासिक महादेव गडाचे अवशेष अजुनही आढळुन येतात.लेप्टनंट कर्नल मॉर्गन यांनी हा गड 1830 मध्ये जिंकला होता.अशी इतिहासात नोंद आहे.इंग्रज सैन्याच्या 14 व्या तुकडीतील एल्सन विल्मॉट हा सैनिक मारला गेला. त्याचे तसेच कर्नल लोचरट यांच्या पत्नीचे थडगे रस्त्यावर आढळुन येते.कुडाळ,फोंडा,सावंतवाडी या कोकणातील महत्वाच्या मुलुखांवर महादेव गडावरुन टेहाळणी करणे त्यावेळी सोपी जात असे.
|
|
|