मागे सावडाव
             


        कणकवली- पाचोबाच्या पवित्र सान्निध्यात उगम पावणा-या नदीला वाटेत अनेक नद्या आणि ओहोळ येऊन मिळाले आहेत. त्यातील सावडाव धबधब्याची नदी एक आहे. सावडाव आणि माईण गावाच्या डोंगरमाथ्यावर या नदीचा उगम आहे. कातळावर साठलेले पावसाचे पाणी एकत्र होत मोठा प्रवाह होतो. पुढे हा प्रवाह एका अजस्र् खडकावरून खाली कोसळतो आणि सावडावच्या सुंदर नयनरम्य धबधबाचा प्रवास गर्द वनराईतून सुरू होतो आणि ओटव गावच्या सीमेवर पाचोबा नदीत विलीन होतो. निसर्ग सौंदर्याबरोबरच फेसाळात खाली कोसळणारा हा धबधबा जिल्हयातील व बाहेरील पर्यटकांचे खास आकर्षण आहे. नदीच्या उगमापासून सुमारे ७ कि.मी.चा प्रवास गावाला कृषी क्षेत्राबरोबरच पर्यटनदृष्टया समृद्ध करणारा आहे.हा धबधबा जिथे कोसळतो त्या ठिकाणी समोर इथे येणा-या पर्यटकांना विनाअडचण या धबधव्याचा आनंद घेता यावा म्हणूनच की काय नैसर्गिक तळीच तयार झाली आहे.जंगली डुक्कर, बिबटे, पिसई, भेकरे, खवलेमांजर, रानससे आदी विविध प्राणी इथे पाहायला मिळतात. भारद्वाज पक्षाचे वास्तव्य मोठया प्रमाणावर पाहायला मिळते. सावडाव गावातील या धबधब्याच्या ठिकाणी कणकवलीहून निघाल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील सावडाव फाटा इथून जाता येते. या धबधब्यावर थेट रस्ता जातो.
        मागे